Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

औंध-बाणेर-बालेवाडी परिसरातील लोकसहभाग संवाद बैठक संपन्न

मार्च ३, २०१८

औंध-बाणेर-बालेवाडी परिसरातील लोकसहभाग संवाद बैठक संपन्न

आगामी व चालू प्रकल्पांबाबत नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित लोकसहभाग बैठक शनिवार ३ मार्च २०१८ रोजी औंध वॉर्ड कार्यालयामध्ये पार पडली. बैठकीला औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस यांनी बैठकीला संबोधित केले.

पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत क्षेत्र आधारित विकासामध्ये औंध-बाणेर-बालेवाडी परिसराधील प्रस्तावित व चालू असणाऱ्या प्रकल्पांबद्दल नागरिकांचे प्रश्न स्मार्ट सिटी अधिकाऱ्यानी जाणून घेतले. सद्यस्थितीतील चालू प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. नागरिकांनी या प्रकल्पांबाबत असलेल्या अपेक्षा या बैठकीत मांडल्या. तसेच, रस्ता रुंदीकरण आणि मंडईच्या पुनर्वसनाबद्दलचा मुद्दा काही नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. या मुद्द्यांबाबत पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांपर्यंत नागरिकांचे म्हणणे पोचविण्यात येईल. तसेच, मंडईबद्दलचा जो विषय न्याप्रविष्ट आहे त्याची सद्यस्थिती जाणून घेऊन त्याबद्दल नागरिकांना महिनाभरात अवगत करण्यात येईल, असे स्मार्ट सिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे. या मुद्द्यांवर चर्चा करून त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे राष्ट्रीय संचालक डॉ. समीर शर्मा यांनी नुकत्याच केलेल्या पुणे दौऱ्यामध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या या सिटिझन एंगेजमेंट उपक्रमाची विशेष दखल घेतली आहे. देशातील इतर शहरांमध्ये नागरिकांशी सोशल मीडिया व इतर आभासी माध्यमांतून संवाद साधला जातो. परंतु पुणे स्मार्ट सिटी नागरिकांना या माध्यमांसह थेट भेटूनही संवाद साधत असल्याबद्दल डॉ. शर्मा यांनी विशेष कौतुक केले.

“विकासकामे करत असताना स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत नागरिकांचे म्हणणे खुलेपणाने ऐकून घेऊन त्याचा गांभीर्याने विचार केला जातो. अशा प्रकारे नागरिकांना विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेणाऱ्या संस्थांमध्ये पुणे स्मार्ट सिटीचे काम हे देशात उल्लेखनीय आहे,” असे श्री. मनोजित बोस यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यापासून विकासकामांबद्दल नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सिटिझन एंगेजमेंट बैठकीचे आयोजन करण्यात येते. या बैठकीमध्ये नागरिकांचे अभिप्राय व सूचना स्वीकारल्या जातात. औंध, बाणेर, बालेवाडी या परिसरातील नागरिकांची एकत्रित नागरिक सहभाग बैठक ही महिन्याच्या पहिल्या शानिवारी, तर या परिसरातील विविध भागांसाठी विकेंद्रित बैठक ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट