Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

खुल्या वातावरणात स्मार्ट लोकसहभाग संवाद; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व कौतुक

एप्रिल २४, २०१८

खुल्या वातावरणात स्मार्ट लोकसहभाग संवाद; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व कौतुक

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत नागरिकांशी सकारात्मक चर्चा, सहकार्याची ग्वाही

नेहमीच्या सभागृहात बैठक घेण्यापेक्षा पुणे स्मार्ट सिटीनेच विकसित केलेल्या स्मार्ट प्लेसमेकिंगच्या ठिकाणी नागरिकांना निमंत्रित करून पुणे स्मार्ट सिटीच्या अधिकारी व प्रतिनिधींनी त्यांच्याशी विकासकामांबद्दल थेट संवाद साधला. या अभिनव लोकसहभाग संवाद बैठकीचे येथील नागरिकांनी उत्साहात स्वागत व कौतुक केले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित लोकसहभाग बैठक बाणेर येथील ‘रिन्यू’ या प्लेसमेकिंगच्या ठिकाणी उत्साहात पार पडली. बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे बैठकीला उपस्थित होते. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस यांनी बैठकीला संबोधित करत स्मार्ट सिटीमधील विविध संकल्पना स्पष्ट करत लोकांना समजावून सांगितल्या.

पुणे स्मार्ट सिटीने परिसर आधारित विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थळ सुशोभीकरण करून रिन्यू हे स्थळ विकसित केले आहे. बाणेर-बालेवाडी परिसरातील प्रस्तावित व चालू असणाऱ्या प्रकल्पांबद्दल नागरिकांचे प्रश्न स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. सद्यस्थितीतील चालू प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. नागरिकांनी या प्रकल्पांबाबत असलेल्या अपेक्षा या बैठकीत मांडल्या. या मुद्द्यांवर चर्चा करून त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

श्री. मनोजित बोस म्हणाले, “आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत नागरिकांचे म्हणणे खुलेपणाने ऐकून घेऊन त्याचा गांभीर्याने विचार करतो, त्यामुळे विकासकामांमध्ये एक प्रकारे थेट सहभागी होण्याची संधी नागरिकांना मिळते. नागरिकांना विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेणाऱ्या संस्थांमध्ये पुणे स्मार्ट सिटी ही देशातील एकमेव स्मार्ट सिटी आहे.”

लोकसहभागाच्या या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे शहराची मूळ स्वाभाविक वैशिष्ट्ये म्हणजे पुणेरीपण जपत स्मार्ट विकास करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी लोकांना अनुकूल असा ‘पीपल फ्रेंडली’ प्रभावी विकास साधण्यासाठी लोकसहभाग बैठक (सिटीझन एंगेजमेंट) अधिक खुली व सर्वसमावेशक करत आहोत.”

पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सिटिझन एंगेजमेंट बैठकीचे आयोजन करण्यात येते. या बैठकीमध्ये नागरिकांचे अभिप्राय व सूचना स्वीकारल्या जातात. औंध, बाणेर, बालेवाडी या परिसरातील नागरिकांची एकत्रित नागरिक सहभाग बैठक ही महिन्याच्या पहिल्या शानिवारी, तर या परिसरातील विविध भागांसाठी विकेंद्रित बैठक ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे राष्ट्रीय संचालक डॉ. समीर शर्मा यांनी नुकत्याच केलेल्या पुणे दौऱ्यामध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या या सिटिझन एंगेजमेंट उपक्रमाची विशेष दखल घेतली आहे. देशातील इतर शहरांमध्ये नागरिकांशी सोशल मीडिया व इतर आभासी माध्यमांतून संवाद साधला जातो. परंतु पुणे स्मार्ट सिटी नागरिकांना या माध्यमांसह थेट भेटूनही संवाद साधत असल्याबद्दल डॉ. समीर शर्मा यांनी विशेष कौतुक केले.

Last modified: मंगळवार मार्च 6th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट