Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीने पटकावला सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया पुरस्कार

डिसेंबर ४, २०१८

पुणे स्मार्ट सिटीने पटकावला सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया पुरस्कार

नागरिक व विविध संस्थांच्या पाठिंब्यामुळे पुणे स्मार्ट सिटीला पुरस्कार- सीईओ डॉ. राजेंद्र जगताप

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) यंदाचा बिझनेस वर्ल्ड सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्लीमधील हॉटेल शांग्रीला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पीएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप व मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी पुणेकरांच्या वतीने नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.

सहावी स्मार्ट सिटी परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात हिमाचल प्रदेशच्या नगरविकास मंत्री श्रीमती शर्वीन चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. चौधरी यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.

सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी म्हणून गौरविण्यात आल्याने हा पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. यामुळे मूल्यवर्धित तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अमंलबजावणीचा उत्साह द्विगुणित झाला आहे.”

यावेळी आयोजित ‘नागरी आधुनिकीकरण आणि सुकर जीवन यातील नाविन्यूपर्ण उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्राचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जगताप सहभागी झाले होते. ते म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीने हाती घेतलेले अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत.” एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे पोलिस, वाहतूक, अग्निशमन अशा शक्य तितक्या विभागांना एकमेकांशी जोडता येऊ शकते. तसेच रस्त्यांसाठी अधिक बिनचूक तरतुदी करण्यासाठी रस्त्यांच्या डेटाबेसचा उपयोग होतो. शहरातील विविध बाबींचे ७० ते ८० टक्के जिओटॅगिंग करण्याबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.

मुख्य ज्ञान अधिकारी श्री. मनोजित बोस यांनी पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशनबद्दल यावेळी विशेष सादरीकरण केले. तसेच, तंत्रज्ञानाच्या आधारे बदलणारे शहरी दळणवळण या विषयावरील चर्चासत्राचे त्यांनी सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, “केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे तर नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम पुणे स्मार्ट सिटी करत आहे. त्याची दखल वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतली जात आहे. हा पुरस्कार प्रोत्साहन देणारा आहे.”

यावेळी देशभरातील स्मार्ट सिटींशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याशी सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. येथील स्थानिक विकास प्रकल्पांबाबत त्यांना माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल चर्चा केली.

पुणे स्मार्ट सिटीबद्दल…
अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा, प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…
अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: मंगळवार डिसेंबर 4th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट