Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचे उद्घाटन

डिसेंबर ५, २०१७

पुणे स्मार्ट सिटीचा, झूमकार (PEDL) व ओएफओ कंपनीच्या सहकार्याने, प्रायोगिक तत्त्वावरील “पब्लिक बायसिकल शेअरींग “ पथदर्शी प्रकल्प :

पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचे उद् घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, आमदार विजय काळे, आमदार मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. ए. डी. शाळीग्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (PSCDCL) वतीने व झूमकार PEDL, ओएफओच्या सहकार्याने पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचा हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याची सुरूवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आली. औंधमध्येही ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, “पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या माध्यमातून प्रदूषण तर टाळले जाईलच, त्याचबरोबर उपभोक्त्या नागरिकांना शारीरिक तुंदुरूस्ती राखण्यास मदत होईल. पुण्यातील इतर भागात असा उपक्रम राबवण्यासाठी पुणे महानगरपालिका सहकार्य करेल.”

सायकल वापरा, प्रदूषण टाळा, असं आवाहनही महापौर मुक्ता टिळक यांनी नागरिकांना केले.

डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. म्हणाले, “ झूमकार (PEDL) व ओएफओच्या सहकार्याने अशी नाविण्यपूर्ण सामूहिक सायकल सेवा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सुमारे ३० वर्षांपुर्वी आम्ही शाळेत असताना पुण्यात कमी किंमतीत भाडेतत्त्वावर सायकली मिळायच्या. आजही, अत्यंत नाममात्र दरात ही पब्लिक बायसिकल शेअरींग सेवा उपलब्ध होत आहे. या पर्यावरण- पूरक व लोककेंद्री उपक्रमामुळे ‘सायकलींचे शहर’ ही जुनी ओळख नव्याने प्रस्थापित करण्यात पुणे शहराला निश्चितचं मदत होईल. पुणे विद्यापीठ परिसर वाहनमुक्त होण्यासाठी ही सेवा अनुकूल ठरेल. जैवविविधतेच्यादृष्टीने परिसर संपन्न होण्यासही या सेवेची मदत होईल. पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटर, बिग डेटा इ. बाबींत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काम करायचे आहे. ”

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा ही पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांची नाविण्यपूर्ण संकल्पना असून या सेवेमुळे विद्यापीठ परिसर पर्यावरणदृष्ट्या हरित राहण्यास मदतच होईल. विद्यार्थ्यांनी या सेवेचे केवळ लाभार्थी न राहता पुणे स्मार्ट शहर होण्यासाठी योगदान द्यावे.”

आमदार विजय काळे व आमदार मेधा कुलकर्णी तसेच झूमकार PEDL चे मुख्य कार्यकारी अधिकारी मॉर्गन ग्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

नागरिक व इतर समाजघटकांच्या विस्तृत सल्लापरामर्शाने तयार करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) क्षेत्राचा पुनर्विकास अभिप्रेत आहे. या पथदर्शी उपक्रमाद्वारे नागरिकांना पब्लिक बायसिकल शेअरींग सेवेचा अनुभव घेता येणार आहे. त्यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या मदतीने हा उपक्रम इतर क्षेत्रातही राबवला जाणार आहे. पुणे शहरात, या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेची आखणी करण्यासाठी, पुणे स्मार्ट सिटी व पुणे महानगरपालिकेला या प्रकल्पातील सहभागी नागरिकांच्या अभिप्रायांची मदतही होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित हा पथदर्शी उपक्रम नाममात्र सेवाशुल्कात नागरिकांना उपलब्ध होणार आहे, त्यासाठी ई-पेमेंट मोबाईल एप सुविधेची तरतूद करण्यात येणार आहे. औंध व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सायकल पार्किंगसाठी ठराविक जागांचीही तरतूद करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी झूमकार (PEDL) आणि ओफओ, या दोन कंपन्यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे सहकार्याचा हात पुढे केला आहे.

पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत येणाऱ्या प्लेस मेकिंग व रस्ते पुनरर्चना इ. या प्रकल्पांनाही पब्लिक बायसिकल शेअरिंग पथदर्शी प्रकल्प पूरक ठरणार आहे. औंध-बाणेर- बालेवाडी योजनेंतर्गत सायकलच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. ने रु. १० कोटी राखून ठेवले असून प्रकल्पामुळे परिसर स्वच्छ व हरित तसेच पुणेकर निरोगी व तंदुरूस्त राहण्यासही मदत होणार आहे.

सायकलींवर नुसती नजर टाकली तरी पुणेकर हरकले नाही तर नवलचं! उपभोक्त्याची गरज लक्षात घेऊन सायकलचे डिझाईन करण्यात आले आहे. त्यात- एल्युमिनियम अलॉय फ्रेम्स, ड्रम ब्रेक्स, अँण्टी स्लीप चेन्स, वातरहित घन टायर्स व उंचीनुसार कमी-जास्त होणारे सीट्स यांचा समावेश आहे. या उपक्रमात स्थानिक सायकलींग शेअरींग व कमीत कमी निगराणी यावर लक्ष देण्यात येणार आहे. पण, काहीबाबींत निगराणीची गरज भासल्यास ग्राहकांकडून वेब /एप द्वारे संबधित माहिती मागवण्यात येणार आहे. असुरक्षित व नुकसानकारक सायकली सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत. डेटा संरक्षण कायद्यानुसार, उपभोक्त्याच्या वैयक्तिक डेटा संरक्षणाची खात्रीही उपभोक्त्याला देण्यात येणार आहे.

Last modified: शुक्रवार डिसेंबर 15th, 2017

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट