Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

युरोपियन युनियन व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण आणि हॅकेथॉनचे आयोजन

फेबृवारी २६, २०१९

युरोपियन युनियन व पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण आणि हॅकेथॉनचे आयोजन

 

 – भारत-ईयू आयसीटी मानकीकरण सहयोग प्रकल्पाद्वारे हॅकेथॉन घेणारी पुणे ही पहिलीच स्मार्ट सिटी

– सर्वोत्कृष्ट उपाययोजनांच्या सादरकर्त्यांना युरोपातील स्टार्टअप कार्यक्रमास जाण्याची संधी

 

पुणे : युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन टेलिकम्युनिकेशन्स स्टँडर्ड्स इंस्टिट्यूट, भारतीय दूरसंचार मानक विकास संस्था, वन एम2एम, लास सीएनआरएस (फ्रान्स) आणि युरोपियन कमिशन यांचा सहभाग आहे.

‘आयसीटी संबंधित मानकीकरण, धोरण आणि कायद्याबाबत भारत- ईयू सहकार’ या प्रकल्पाअंतर्गत पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा उपक्रम ठरणार आहे. उत्पादन आणि आयसीटी मानकांचा वापर आणि सांख्यिकी माहितीची देवाणघेवाण सुसंगत होण्यासाठी भारत आणि युरोपमधील संबंध दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण आणि वापर वाढवणे आणि व्यावसायिक सहजता वाढवून व्यापार सुलभ करणे शक्य होणार आहे.

या उपक्रमासाठी देशभरातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. मानक-अनुरूप स्मार्ट सिटी अॅप्लिकेशन्स कशी विकसित करावीत आणि आपल्या उपाययोजना जागतिक पातळीवर कसे पोचवाव्यात हे शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना डेव्हलपरच्या ट्यूटोरियल आणि हॅकेथॉनद्वारे मिळणार आहे. स्मार्ट सिटीपुढील सध्याची आव्हाने कशी हाताळता येतील हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे स्मार्ट सिटीकडून संबंधित माहिती पुरविण्यात देईल. प्रकल्पातील भागधारकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तांत्रिक मदत करण्यात येईल. सर्वात सर्जनशील उपाययोजना मांडणाऱ्या विजेत्या संघास युरोपमधील एका स्टार्ट-अपला भेट देण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील हॅकेथॉनपूर्वी, 13 एप्रिल रोजी आयआयटी गुवाहाटी येथे विकसकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

 

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप म्हणाले, “भारत-ईयू आयसीटी मानकीकरण सहयोग प्रकल्पाद्वारे हा उपक्रम राबविणारी पुणे ही भारतातील पहिली स्मार्ट सिटी ठरणार ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे आणि इतर महत्त्वाच्या संस्था या अद्वितीय उपक्रमात सहभागी होत आहेत. पुणे आयडिया फॅक्टरी फाऊंडेशन (पीफ) या आमच्या उपकंपनीद्वारे नवकल्पनांची संस्कृती रुजविण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने हे पुढचे पाऊल टाकले आहे.”

यावर भाष्य करताना पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस म्हणाले, “तंत्रज्ञानावर केंद्रित प्रकल्पांपासून डेटाप्रणित तंत्रज्ञान कार्यक्रमापर्यंत स्मार्ट सिटींचे स्थित्यंतर, मानकांचे आणि इंटरऑपरेबिलिटीचे पालन करणे शाश्वत विकास आणि वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्मार्ट सिटीमधील जटिल तंत्रज्ञानाची व्याप्ती मोठी आहे. विद्यार्थी आणि तरुणांकडील सर्जनशील कल्पना आणि उपाययोजनांचा समृद्ध स्त्रोत प्राप्त करण्यासाठी जागतिक व देश पातळीवरील अग्रगण्य संस्थांसोबत संयुक्त प्रयत्नांचा आम्ही एक भाग असल्याचा आनंद आहे.”

ईयू प्रतिनिधिमंडळाचे बेनॉइट सॉवरोश यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी सोल्यूशन्सवर भारतासोबत काम करण्यासाठी ईयूची वचनबद्ध आहे. “या हॅकेथॉनची तिसरी आवृत्ती पुण्यात सादर करण्यास उत्सुक आहोत. बंगळूर आणि हैदराबादमध्ये आमच्या पहिल्या दोन हॅकेथॉन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरल्या होत्या. पुण्यातही असेच यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ‘सर्व सहभागींना त्यांच्या कौशल्ये आणि सर्जनशीलता दाखविण्याची संधी मिळेल. भविष्यात स्मार्ट सिटींना उपयुक्त ठरतील अशी अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी मानकांचा वापर यामध्ये करता येईल. हॅकेथॉन विजेत्यांना युरोपला जाऊन व्यावसायिक प्रेरणा घेण्याची संधी मिळेल.”

या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंक पाहा- http://www.indiaeu-ictstandards.in/developers-tutorial-and-hackathon-april-2019/.

भारत-ईयू आयसीटी मानकीकरण सहयोग प्रकल्पाविषयी अधिक माहिती येथे मिळू शकते: http://www.indiaeu-ictstandards.in/

युरोपियन युनियन बद्दल (ईयू):

EU मध्ये 28 देशांचा समावेश असून, ती जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीन आणि भारतानंतर सर्वांत मोठी लोकसंख्या येथे आहे. ईयूमध्ये खूप वैविध्यपूर्ण देश असले तरी, ते शांती, लोकशाही, कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांचा आदर या मूलभूत मूल्यांप्रति वचनबद्ध आहेत. सामायिक हितसंबंधांचे निर्णय लोकशाही पद्धतीने युरोपियन पातळीवर घेता यावेत यासाठी त्यांनी सामायिक संस्था स्थापन केल्या आहेत. सीमामुक्त एकल बाजार आणि एक चलन (युरो) 19 सदस्य देशांनी स्वीकारले असून, ईयूने व्यापार आणि रोजगाराला मोठे उत्तेजन दिले आहे.

ईयू-भारत संबंधः

ईयू आणि भारत यांनी गरिबी कमी करण्यासाठी, आपत्ती रोखण्यासाठी, व्यापार वाढविण्यासाठी आणि ऊर्जा, आरोग्य, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रांतील संयुक्त संशोधनांना प्रोत्साहन देण्यासाठी 57 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र काम केले आहे. ईयू म्हणजे भारतीय परकी गुंतवणुकीसाठी प्राथमिक ठिकाण, तसेच भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. ईयूने नोव्हेंबर 2018 मध्ये भारतविषयक आपले नवीन धोरण जाहीर केले. जागतिक आणि प्रादेशिक समस्यांना सामायिक प्रतिसाद आणि शाश्वत आधुनिकीकरण, हवामानातील बदल, व्यापार व गुंतवणूक, आणि नवसंशोधन अशा चार क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक संबंध आणखी मजबूत करणे असा या नव्या धोरणाचा उद्देश आहे.

अधिक माहिती येथे : http://eeas.europa.eu/delegations/india

***

Last modified: शुक्रवार मार्च 1st, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट