Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

राजस्थान व तेलंगणातील स्मार्ट सिटींच्या अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा केला अभ्यास दौरा

नोव्हेंबर २८, २०१९

राजस्थान व तेलंगणातील स्मार्ट सिटींच्या अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा केला अभ्यास दौरा

पुणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे मॉडेल पाच शहरांमध्ये राबविणार

पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत राजस्थानमधील चार शहरांतील व तेलंगणातील हैदराबाद येथील अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने नुकतेच पुण्याचे विशेष अभ्यास दौरे करून पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी रुबल अगरवाल यांनी सध्या सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांचे सादरीकरण करून या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला संबोधित केले.

राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, कोटा आणि अजमेर या शहरांतील सोळा अधिकाऱ्यांचे, तर हैदराबाद येथील ६ प्रतिनिधींच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यामध्ये स्मार्ट स्ट्रीट, स्मार्ट प्लेस मेकिंग, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. हैदराबादच्या पथकात महापौर डॉ. बोन्तू राममोहन यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता, तर राजस्थानच्या पथकाचे प्रतिनिधित्व उदयपूर स्मार्ट सिटीचे सीईओ कमर चौधरी, जयपूर स्मार्ट सिटीचे सीईओ लोक बंधू आणि कोटा शहराचे आयुक्त वासुदेव मालावत यांनी केले.

पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल म्हणाल्या, “विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून विविध प्रकल्पांची अंमलबजावणी स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांना नागरिकांचा मोठा पाठिंबा आणि राष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. हे प्रकल्प अभ्यासण्यासाठी इतर राज्यांतूनही अधिकाऱ्यांची पथके येत आहेत ही आनंदाची बाब आहे.”

या अधिकाऱ्यांच्या पथकाने बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील ‘रिन्यू व एनर्जाईज’ व इतर स्मार्ट प्लेसमेकिंग साईट्सना भेट दिली. औंधमधील स्मार्ट स्ट्रीटची विविध वैशिष्ट्ये प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतली. सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर येथील डिजिटल एक्सपीरियन्स सेंटर, कमांड अँड कंट्रोल सेंटर प्रकल्पाला भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली. अल्प उत्पन्न गटासाठीच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या औंधमधील ‘लाईटहाऊस’ या प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली. तिथे दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली, तसेच येथे प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळविलेल्या युवकांशी संवाद साधला.

Last modified: गुरुवार नोव्हेंबर 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट