Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्मार्ट पुणेकरांनी पटकावला केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट २०१८’ पुरस्कार

फेबृवारी १२, २०१९

स्मार्ट पुणेकरांनी पटकावला केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट २०१८’ पुरस्कार

पुणे : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने पुणे शहराला ‘बेस्ट डिजिटल पेमेंटस ऍडॉप्टर’ श्रेणीमधील `स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट २०१८’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

स्मार्ट सिटी मिशन योजनेअंतर्गत असलेल्या देशभरातील एकूण १०० शहरांमध्ये डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कारांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी जुलै २०१८ पासून महानगरपालिकेतील विविध प्रकारच्या डिजिटल व्यवहारांचा अभ्यास करण्यात आला.

त्यामध्ये मिळकत कर, विविध प्रकारचे परवाने, ना हरकत प्रमाणपत्रे तसेच इतर सेवांसाठीचे शुल्क डिजीटली अदा करण्यासाठीच्या डिजिटल व्यवस्था त्याचा नागरिकांनी केलेला वापर तसेच महानगरपालिकेकडून कंत्राटदार आणि इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना द्यावयाच्या देयकांचे डिजीटलायझेशन आणि त्यांचा वापर आदी बाबींचा अभ्यास करण्यात आला.

डिजिटल पेमेंट्सची प्रणाली राबविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापाल श्रीमती. उल्का कळसकर आणि माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. राहुल जगताप यांनी माननीय आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “डिजिटल पेमेंटच्या नव्या तंत्रज्ञानाला त्वरीत आत्मसात करून त्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या स्मार्ट पुणेकरांना या पुरस्काराचे श्रेय जाते. सर्व प्रकारच्या नागरी सेवांचे शुल्क ऑनलाईन भरता यावे या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान, तसेच विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पुरस्कारामुळे डिजिटल पेमेंटच्या या परिवर्तनाला प्रोत्साहन व चालना मिळेल.”

या पुरस्काराच्या पहिल्या टप्प्यासाठी देशभरातील ७२ स्मार्ट शहरे पात्र ठरली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ६५ शहरांनी सादरीकरण केले.  त्यामध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलल्या शहरांमध्ये `बेस्ट डिजिटल पेमेंटस ऍडॉप्टर’ श्रेणीत पुणे शहराला पुरस्कार प्राप्त झाला. केंद्र सरकारच्यावतीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

Last modified: मंगळवार फेबृवारी 12th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट