Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

फेबृवारी ७, २०१९

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

स्मार्ट ई-बस, स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर, ऑफिस राइड, स्मार्ट रस्ते, प्लेसमेकिंग साइट प्रकल्पांचे उद्घाटन

पुणे– शहरात विविध पायाभूत सुविधांचा स्मार्ट विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी, ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सणस मैदान येथे दुपारी ३ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, ऑफिस राईड अॅप्लिकेशन, स्मार्ट स्ट्रीट रिडिझाईन, प्लेसमेकिंग साईट्स, स्मार्ट स्कूल्स हे महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा प्रगत टप्पा पुणे स्मार्ट सिटीने गाठला आहे.

स्मार्ट इलेक्ट्रिक बसच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी 9 मीटर लांबीच्या नॉन-बीआरटी 25 एसी इलेक्ट्रिक बस, 12 मीटर लांबीच्या 125 बीआरटी एसी इलेक्ट्रिक बस असतील. पहिल्या टप्प्यातील २५ बसची खरेदी करण्यात आली असून त्या दाखल झाल्या आहेत.

स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्प : पुणे स्मार्ट सिटीच्या आराखड्यात इलेक्ट्रिक बसची खरेदी आणि संचालन हा सार्वजनिक वाहतुकीचा एक प्रमुख उपक्रम म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. पुणे महानगरपालिका, पीएमपीएमएल आणि पुणे स्मार्ट सिटी (पीएससीडीसीएल) यांच्यातील समन्वयाच्या आधारे पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांसाठी विविध टप्प्यांत एकूण 500 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले  आहे.

इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी पुणे स्मार्ट सिटी ‘पीएमपीएमएल’सोबत काम करीत आहे. पुणे स्मार्ट सिटी प्लॅननुसार इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी तसेच चार्जिंगसारख्या पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद केली आहे.

स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेटंर : एससीओसी हे एक उच्च दर्जाचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे जे शहरातील विविध कामकाजांची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सध्याचे स्मार्ट इलेमेंट्स आणि भविष्यातील आयटी इन्फ्रास्ट्रक्चरसह पुण्यातील विकसित स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरला संलग्न करण्याची क्षमता यामध्ये आहे.

सध्या सुमारे 700 स्मार्ट इलेमेंट्स येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडलेले आहेत. यामध्ये वाय-फाय हॉट स्पॉट्स, पर्यावरणीय सेन्सर, सार्वत्रिक घोषणा, आपत्कालीन प्रतिसाद- एमर्जन्सी कॉल बॉक्स आणि व्हेरिएबल मेसेजिंग सिस्टम्स यांचा समावेश आहे. आगामी काळात याचा आणखी विस्तार केला जाणार आहे.

वाहतूक पोलिस, पीएमपीएमएल या इतर विभागांच्या ई-चलन, आयटीएमएस, सर्व्हेलन्स, स्मार्ट लाइटिंग अशा यंत्रणांचे एससीओसीसोबत संलग्नीकरणही पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या सेवांशी संलग्न करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या युज केसेसदेखील मानक कार्यपद्धतीसह कार्यरत आहेत.

ऑफिस राइड शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचे अॅपसामायिक दळणवळणाचा म्हणजेच शेअर्ड मोबिलिटीचा वापर करण्यास प्रोत्साहित करून वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यात ‘ऑफिस राइड’ मदत करेल आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कला येणाऱ्या सुमारे साडेतीन  लाख कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होईल. ऑफिस राइड अॅप्लिकेशनद्वारे वापरकर्ते त्यांचे प्रवास नियोजन, बुकिंग आणि संबंधित वाहनाचे ट्रॅकिंग करू शकतील.

महाराष्ट्र सरकार आणि फोर्ड स्मार्ट मोबिलिटी यांच्यात असलेल्या स्टेटमेंट ऑफ इन्टेंटच्या अनुषंगानेच पुणे स्मार्ट सिटी आणि फोर्ड स्मार्ट मोबिलिटी यांच्यात झालेल्या करारानुसार नियोजित अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.

 

स्मार्ट रस्ते पुनर्रचना

पुणे शहराकरिता स्मार्ट सिटी प्लॅनचा एक भाग म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात रस्त्यांचे पुनर्रचना प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत रु. 300 कोटींचे सुमारे 42 किलोमीटर लांबीचे स्मार्ट स्ट्रीट करण्यात येत आहेत. यातील मिटकॉन रस्त्याचे उद्घाटन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यामध्ये बाणेरमध्ये 10.2 किमी, बालेवाडीमध्ये 16.5 किमी, आणि औंधमध्ये 4.5 किमी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. 25 वर्षांच्या वीज, पाणी आणि ड्रेनेजसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत विस्तृत शहरी रस्त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विकास करण्यात येत आहे.

हा प्रकल्प पुणे महापालिकेच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. एमएनजीएल, पीएमआरडीए, पाणीपुरवठा अशा विविध संस्थांशी समन्वय साधण्यासाठी महापालिकेचा पथ विभाग नोडल एजन्सी काम करत आहे.

हा प्रकल्प 2018 मध्ये पुणे स्मार्ट सिटीने सुरू केला आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असून, डिसेंबर 2019 मध्ये तो पूर्ण होणे अपेक्षित आहे.

 

प्लेसमेकिंग साइट

वापरात नसलेल्या आणि अप्रयुक्त भूखंडांचा कायापालट करण्याचे काम पुणे स्मार्ट सिटीने हाती घेतले आहे. स्थानिक रहिवाशांसाठी थीम आधारित स्मार्ट शहरी स्थळनिर्मिती करण्यात येत आहे. कला आणि संस्कृती, कौशल्य विकास आणि ई-लर्निंग, नवनिर्मिती, फिटनेस इत्यादी थीम घेऊन या ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. खालील दोन प्लेसमेकिंग साइट्स उद्घाटन करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

सायन्स पार्क

खेळकर वातावरणात विज्ञान विषयाबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी सायन्स पार्क दहा हजार चौरस फुटांवर विकसित करण्यात आले आहे.

सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ, आकाशगंगेसारखी रचना असणारे बदामी प्रेक्षागृह (अॅम्फीथिएटर) आणि इतर विविध वैज्ञानिक साधने येथे आहेत.

सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी विज्ञानाशी संबंधित विविध विषयांनुसार विभागलेले खेळांचे साहित्य या प्रकल्पात आहे.

बुकझानिया

  • मुलांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वाचनाची सवय लावण्यासाठी ही थीम करण्यात आली आहे. बुकझानिया प्लेसमेकिंग साइट 6500 चौरस फूट क्षेत्रफळावर विकसित केली आहे.
  • येथील शांत भवताल आणि मोठ्या वृक्षांमुळे ही जागा निश्चित करण्यात आली असून, तसेच, ज्येष्ठांसाठी छंद जोपासण्याची जागाही पुरवण्यात आली आहे. लोकांमध्ये बंध निर्माण करणाऱ्या बोर्ड गेम्स, तसेच ज्येष्ठांसाठी आकर्षक आसन व्यवस्था, मुलांसाठी सोईस्कर बैठक आणि खेळण्यासाठी पुस्तकासारख्या रचना, आणि निसर्गाशी मैत्री करण्यास प्रोत्साहन देण्यासाठीची वैशिष्ट्ये असलेली ही रचना करण्यात आली आहे.

 

स्मार्ट स्कूल्स

जागतिक दर्जाचे राहणीमानाच्या मानदंडांप्रमाणे पुणे शहराचा परिसर टप्प्याटप्प्यात विकसित करण्याचे पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रस्तावित आहे. स्थानिक पथदर्शी प्रकल्पांपासून याची सुरवात करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे शाळा आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत संरचना आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये समग्र परिवर्तन होईल. या उपक्रमा अंतर्गत, औंध-बाणेर-बालेवाडी भागातील महापालिकेच्या शाळांचे स्मार्ट स्कूल्समध्ये वेगाने रूपांतर करण्यात येत आहे. वेगवेगळ्या थीमवर आधारित अंमलबजावणीद्वारे सध्याच्या शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये त्वरित रूपांतर करणे हे उद्दिष्ट आहे.

विविध थीमप्रमाणे शाळांच्या विकासाची योजना असून, त्याप्रमाणे महापालिकेच्या शाळांचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. यामध्ये अंतर्गत फर्निशिंगसोबतच ई-लर्निंग सॉफ्टवेअरने सुसज्ज अशा डिजिटल क्लासरुम तयार करण्यात आल्या आहेत.

खालील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

कटके स्कूल, बाणेर: 900 विद्यार्थी संख्या असलेल्या 15 वर्गांचे अपग्रेडेशन यात दोन टप्प्यांमध्ये समाविष्ट आहे.

इंदिरा गांधी मॉडेल स्कूल, औंध : 400 विद्यार्थी संख्या असलेल्या 13 वर्गांचे अपग्रेडेशन यात समाविष्ट आहे.

Last modified: सोमवार नोव्हेंबर 4th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट