Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

स्वच्छतेत पुण्याला नंबर वन करण्याचे उद्दिष्ट

एप्रिल २४, २०१९

स्वच्छतेत पुण्याला नंबर वन करण्याचे उद्दिष्ट

 शून्य कचरा प्रकल्पासाठी महापालिका व पुणे स्मार्ट सिटीचा पुढाकार

 पुणे – पुणे स्मार्ट सिटीच्या पुढाकारातून व पुणे महापालिकेच्या सहकार्याने औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या भागातील दोन व इतर दोन अशा एकूण चार प्रभागांमध्ये शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. येथील यशस्वी अंमलबजावणीनंतर संपूर्ण शहरात हा प्रकल्प राबवून पुढील वर्षीपर्यंत पुणे शहर स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक एकवर पोचविण्याचा निर्धार पुणे महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

 पुणे शहराला कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी आणि येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत सजग व संवेदनाशील करणे, त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या प्रकल्प नियोजनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांना व संस्थांना हा पथदर्शी प्रकल्प मार्गदर्शक ठरणार आहे.

याबाबत महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी यशदा येथे नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुणे महापालिका, पुणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यावरण शिक्षण संस्था (सीईई), आणि स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महापालिकेचे सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक, पुणे स्मार्ट सिटीचे क्षेत्र विकास अधिकारी श्री. वसंत पाटील, घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त श्री. माधव जगताप, आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे, सल्लागार जिगिषा मसकर, सीईईचे श्री. अविनाश मधाळे, संस्कृती मेनन, लक्ष्मी नारायण व इतर मान्यवर उपस्थित होते.

 सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, सूक्ष्म पातळीपर्यंत नियोजन आणि चर्चा झाली आहे. आता वेगाने प्रत्यक्ष कृती करून शून्य कचऱ्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. केवळ क्रमवारीच्या दृष्टीने नव्हे तर समर्पित भावनेने पुणे महापालिकेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आपले शहर नक्कीच पहिल्या क्रमांकावर पोचेल.

श्री. वसंत पाटील म्हणाले, प्रकल्प परिचय आणि अभिप्राय, जीआयएस माहिती आधारे सूक्ष्म नियोजन, कोठी निहाय कृती प्राधान्यक्रम निश्चिती, जाणीव जागृतीसाठी माहिती, शिक्षण आणि संसूचन नियोजन यावर कार्यशाळेमध्ये भर देण्यात आला. तसेच, त्या अनुषंगाने कर्मचारी, अधिकारी आणि तज्ञ यांच्यात खुली चर्चाही करण्यात आली. यामुळे ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

 पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “कचरा व्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात इतर शहरांच्या तुलनेत पुण्याने आघाडी घेतली आहे. या विषयाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी संबंधित संस्थांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पुणे स्मार्ट सिटीबद्दल

अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा, प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: मंगळवार एप्रिल 24th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट