Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे पुन्हा बनणार सायकलींचे शहर

डिसेंबर २, २०१७

झूमकार-PEDL च्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटीची ‘सार्वजनिक सायकल शेअरिंग व्यवस्था’:

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (PSCDCL) वतीने सार्वजनिक सायकल शेअरिंगची प्रायोगिक तत्त्वावरील सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झूमकार PEDL च्या सहकार्याने या सेवेचा पथदर्शी प्रकल्प औंध आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राबविण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवार, ५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी साडेदहा वाजता या सेवेचा प्रारंभ करण्याचे नियोजित आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

स्मार्ट सिटी मोहिमेचा एक भाग म्हणून, औंधमध्ये दीड किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ठिकाणी एक सायकल मार्गही तयार करण्यात आला असून, सायकल मार्गाची रचना कशी असावी व त्याचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी हा मार्ग पथदर्शी ठरेल. ‘पुणे स्ट्रीट्स’ कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा रोड, सोलापूर रोड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, शहरातील मध्यवर्ती भाग आणि सिंहगड रस्त्याचाही समावेश आहे. ‘पुणे सायकल योजना’तयार करत असताना यापैकी काही रस्त्यांच्या रचनेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार सायकल चालकांना सोयीस्कर अशी सायकल मार्गांची रचना आणि जंक्शन तयार करण्याच्या सूचना अनुषंगाने रस्ते विभागाला देण्यात आल्या आहेत.

वाहतूक क्षेत्राला प्राधान्य देणे आणि या क्षेत्राकडे गुंतवणूक वळवणे हे सर्वसमावेशक दळवळण आराखडा (मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यामागील एक प्रमुख उद्दिष्ट हे आहे. या प्रकल्पाच्या किमतीचा विचार करताना त्याची कार्यवाही आणि देखभाल या घटकांचा विचार महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प शाश्वत बनविण्यासाठी हा विचार महत्त्वाचा ठरतो. मोबिलिटी प्लॅनमध्ये वाहनांच्या साह्याने दळणवळण करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यामध्ये सायकलसारख्या स्वयंचलित नसलेल्या (नॉन- मोटराईज्ड) वाहनांवर कमी भर देण्यात आला होता. मात्र, स्मार्ट सिटी मोहिमेने हे चित्र बदलले आहे. आता सायकलच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्यामध्ये सायकलसाठी खास समर्पित मार्गांचा समावेश असून, या सायकल मार्गांना वेगळा रंग दिला जाईल. त्याचप्रमाणे सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवा आणि IOC तयार करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये सायकल, रस्त्यांची रचना, पादचारी मार्ग, जंक्शन्स, मोकळ्या जागा (ओपन स्पेस) आणि मोटरसायकलरहीत रस्ते यांचा समावेश आहे. पुणेकरांचे जीवन सर्वांगांनी सुसह्य बनविण्यासाठी पुण्याला एक शाश्वत, समृद्ध आणि आकर्षक शहर बनवायचं आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या प्रस्तावामध्ये सायकलींच्या वापरांसंबधी काही उपक्रमांचाही समावेश केलेला आहे. सार्वजनिक सायकल शेअरिंग व्यवस्था राबवून साधारणतः 18 ते 60 महिन्यांमध्ये मोटरसायकलरहीत वाहतूक 1 टक्क्यावरून 8 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 27 किमी आणि 42 किमी लांबीचे सायकल मार्ग उपलब्ध करण्यात येणार आहेत.

नागरिक आणि इतर संबंधित तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून पुणे स्मार्ट सिटी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी (ABB) हा भाग पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पामध्ये नागरिकांना सार्वजनिक सायकल शेअरिंगचा अनुभव घेता येईल. येथील प्रतिसाद लक्षात घेऊन स्मार्ट सिटी आणि पुणे महापालिका संपूर्ण पुणे शहरासाठी ही योजना साकारू शकेल. सायकल शेअरिंग सेवेसाठी एका मोबाईल अॅपद्वारे ई-पेमेंट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्यवहार पेपरलेस होईल. मात्र, आता सुरू करण्यात येणार असलेली पथदर्शी सायकल शेअरिंग सेवा ही नागरिकांसाठी जवळजवळ निःशुल्कच असेल. औंध आणि विद्यापीठामध्ये सायकलींच्या पार्किंगसाठी निश्चित जागा मिळविण्याची तरतूद करण्यात येणार आहे. दोन व्यावसायिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. लोकांना या सेवेचा अनुभव देऊन याबाबत त्यांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी औंध आणि विद्यापीठाचा परिसर तुलनेने सोयीस्कर आहे.

संपूर्ण शहरातून नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी, सल्लागार आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी बैठकाही घेण्यात आल्या. त्यानंतर औंध-बाणेर-बालेवाडी भागात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागात सायकलींसाठी पुरक पायाभूत सुविधा उभारण्यसाठी पुणे स्मार्ट सिटीने दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सायकल शेअरिंग सेवा ही स्मार्ट सिटीच्या रस्ते पुनर्रचना व इतर उपक्रमांना पुरक ठरेल. तसेच, यामुळे शहर स्वच्छ, पर्यावरणपुरक बनविण्यासोबतच ही सायकल योजना पुणेकरांसाठी आरोग्यदायी ठरणार आहे.

Last modified: मंगळवार मे 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट