Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीची, झूमकार (PEDL) व ओएफओ कंपनीच्या सहकार्याने, प्रायोगिक तत्त्वावरील “पब्लिक बायसिकल शेअरींग “ पथदर्शी प्रकल्प राबवण्याची तयारी

नोव्हेंबर २९, २०१७

स्मार्ट सिटी मिशनच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.; झूमकार (PEDL) आणि ओएफओच्या सहकार्याने, औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर ‘पब्लिक बायसिकल शेअरींगचा पथदर्शी प्रकल्प’ राबवणार आहे. नागरिक व इतर समाजघटकांच्या विस्तृत सल्लापरामर्शाने तयार करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) क्षेत्राचा पुनर्विकास अभिप्रेत आहे. या पथदर्शी उपक्रमाद्वारे नागरिकांना पब्लिक बायसिकल शेअरींग सेवेचा अनुभव घेता येणार आहे. त्यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या मदतीने हा उपक्रम इतर क्षेत्रातही राबवला जाणार आहे. पुणे शहरात, या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनेची आखणी करण्यासाठी, पुणे स्मार्ट सिटी व पुणे महानगरपालिकेला या प्रकल्पातील सहभागी नागरिकांच्या अभिप्रायांची मदतही होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित हा पथदर्शी उपक्रम नाममात्र सेवाशुल्कात नागरिकांना उपलब्ध होणार आहे, त्यासाठी ई-पेमेंट मोबाईल एप सुविधेची तरतूद करण्यात येणार आहे. औंध व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सायकल पार्किंगसाठी ठराविक जागांचीही तरतूद करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी झूमकार (PEDL) आणि ओफओ, या दोन कंपन्यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे सहकार्याचा हात पुढे केला आहे आणि डिसेंबर महिन्यात हा उपक्रम अंमलात येण्याची शक्यता आहे.

पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत येणाऱ्या प्लेस मेकिंग व रस्ते पुनरर्चना इ. या प्रकल्पांनाही पब्लिक बायसिकल शेअरिंग पथदर्शी प्रकल्प पूरक ठरणार आहे. औंध-बाणेर- बालेवाडी योजनेंतर्गत सायकलच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि. ने रु. १० कोटी राखून ठेवले असून प्रकल्पामुळे परिसर स्वच्छ व हरित तसेच पुणेकर निरोगी व तंदुरूस्त राहण्यासही मदत होणार आहे.

सायकलींवर नुसती नजर टाकली तरी पुणेकर हरकले नाही तर नवलचं! उपभोक्त्याची गरज लक्षात घेऊन सायकलचे डिझाईन करण्यात आले आहे. त्यात- एल्युमिनियम अलॉय फ्रेम्स, ड्रम ब्रेक्स, अँण्टी स्लीप चेन्स, वातरहित घन टायर्स व उंचीनुसार कमी-जास्त होणारे सीट्स यांचा समावेश आहे. या उपक्रमात स्थानिक सायकलींग शेअरींग व कमीत कमी निगराणी यावर लक्ष देण्यात येणार आहे. पण, काहीबाबींत निगराणीची गरज भासल्यास ग्राहकांकडून वेब /एप द्वारे संबधित माहिती मागवण्यात येणार आहे. असुरक्षित व नुकसानकारक सायकली सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत. डेटा संरक्षण कायद्यानुसार, उपभोक्त्याच्या वैयक्तिक डेटा संरक्षणाची खात्रीही उपभोक्त्याला देण्यात येणार आहे.

या उपक्रमाबद्दल डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट म्हणाले, “ झुमकार (PEDL) व एएफओच्या सहकार्याने अशी नाविण्यपूर्ण सामूहिक सायकल सेवा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या पर्यावरण- पूरक व लोककेंद्री उपक्रमामुळे ‘सायकलींचे शहर’ ही जुनी ओळख नव्याने प्रस्थापित करण्यात पुणे शहराला निश्चितचं मदत होईल.” “लोकसंख्येचे वितरण लक्षात घेऊन सायकलींसाठी लोकप्रिय स्थानके आणि पार्किगच्या जागा शोधण्यासाठी आम्ही लवकरच पुणे स्मार्ट सिटीसोबत काम सुरू करणार आहोत.” ग्रेग मॉरन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक, झूमकार यांनी पुस्ती जोडली.

Last modified: शुक्रवार डिसेंबर 1st, 2017

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट