Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प

ओगस्ट २८, २०१९

पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प

पुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या ठिकाणीच 100% वर्गीकरण सुनिश्चित करणे व कचरा वाहतुकीवरील खर्च कमीत कमी करणे हे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याकरिता 90 हजार कुटुंबांच्या डेटा संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण,  बोपोडी, सुतारवाडीच्या कार्यक्षेत्रात झोपडपट्टी रहिवासी, झोपडपट्टी नसलेली निवासी, व्यावसायिक, संस्थागत, निमशासकीय, शासकीय इत्यादी विविध प्रकारच्या जवळपास 90 हजार मालमत्ता आहेत. औंध वॉर्डच्या भागामध्ये दररोज सुमारे 110 टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी 62.53 टन कचरा हा जैविक आहे. औंध प्रभागातील सुमारे 70 ते 90 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. या ओल्या कचर्‍याची वाहतूक करण्याचा वार्षिक खर्च अंदाजे 9 कोटी 70 लाख रुपये एवढा आहे. यासंदर्भात जागृती व प्रशिक्षणाच्या उद्देशाने अलीकडेच यशदा येथे सर्व संबंधितांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीच्या भागातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची लँडफिल साइटकडे होणारी वाहतूक कमी करणे हा झिरो वेस्ट उपक्रमाच्या मागील दृष्टीकोन आहे. विकेंद्रित कंपोस्टिंग किंवा सेंद्रीय कचरा प्रक्रिया करणार्‍या युनिटच्या ठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया केली जावी आणि त्याद्वारे जागेवरच कचऱ्याचे रुपांतरण केले जावे. ज्याची संपूर्ण पुणे शहरात अंमलबजावणी करता येईल असे शून्य कचरा प्रकल्पाचे प्रत्यक्ष मॉडेल तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.”

प्रस्तावित उपाययोजना :

कचर्‍याचे स्त्रोताच्या ठिकाणी 100% वर्गीकरण करणे हे कचऱ्याच्या समस्येवरील परिणामकारक उपाययोजना ठरू शकते. ओल्या कचर्‍यावर, सेंद्रिय कचर्‍यावर स्त्रोताच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे आणि या प्रक्रियेत खर्चात झालेल्या बचतीचा उपयोग या परिसरात कचरा व्यवस्थापनाच्या मूलभूत सुविधा तयार करणे शक्य होईल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते व हरित रोजगारही निर्माण होतात. यामुळे लँडफिल साइटचे आयुष्य वाढते. माहिती शिक्षण व दळणवळणाच्या उद्देशाने 30 स्वच्छता मित्रांची नेमणूक केली जाईल. कचरा निर्माण करणाऱ्यांनाच स्त्रोताच्या ठिकाणी सेंद्रिय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे स्वच्छता मित्रांचे मुख्य उद्दीष्ट असेल. संपूर्ण प्रकल्पाबाबत घरोघरी जागरुकता आणि उत्तेजन देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छ कोऑपरेटिव्ह आणि पर्यावरण शिक्षण केंद्राची (सेंटर फॉर एनव्हारन्मेंट एज्युकेशन) निवड केली गेली आहे.

प्रकल्पाचे टप्पे

पहिला टप्पा : सर्वेक्षण आणि जीआयएस मॅपिंग

दुसरा टप्पा : संपर्क आणि प्रकल्प शिक्षण, जागरूकता

तिसरा टप्पा : क्षमता वाढवणे आणि योजनेची अंमलबजावणी

चौथा टप्पा : देखरेख आणि हमी

 

Last modified: मंगळवार ओगस्ट 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट