Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत सोसायट्यांमध्ये संवाद बैठकांचे आयोजन जनजागृतीसाठी पुणे स्मार्ट सिटीचा सिटीझन एंगेजमेंट उपक्रम

नोव्हेंबर २०, २०१८

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत सोसायट्यांमध्ये संवाद बैठकांचे आयोजन, जनजागृतीसाठी पुणे स्मार्ट सिटीचा सिटीझन एंगेजमेंट उपक्रम

पुणे : पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबवण्यात येत आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकासाच्या विविध संकल्पनांवर नागरिकांसोबत चर्चा घडवून आणणे हा यामागील उद्देश आहे.

औंधमधील सायली गार्डन सोसायटी आणि हर्ष विहार- ब सोसायटीमधून या उपक्रमाच्या पुढील टप्प्याला नुकतीच सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या दारी स्मार्ट सिटीचे काम पोचवून आणि त्यांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेतल्या जातील. अशा प्रकारे आम्ही स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत आहोत जेणेकरून आपल्या परिसराचा, शहराचा सर्वसमावेशक विकास साधला जाईल असा यामागील विचार आहे. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी होऊ शकतात.
यापूर्वी पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासोबतच जनजागृती करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने बीजगोळे निर्मितीचा उपक्रमही राबवण्यात आला होता. कम्फर्ट झोन सोसायटीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. शुभारंभावेळी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. येथील स्थानिक विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना त्यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढवता येणार आहे. तसेच, नवीन संकल्पना राबवण्यासाठी विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात आता या अभिनव उपक्रमाची भर पडली आहे.

डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना औंध-बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. सर्व स्तरांतील नागरिकांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सिटीझन एंगेजमेंट उपक्रम उपयुक्त ठरेल.”

पुणे स्मार्ट सिटीबद्दल…
अलीकडच्या काळात पुणे स्मार्ट सिटीने रस्ते पुनर्रचना, सार्वजनिक सायकल सेवा, मोफत पुणे वाय-फाय सेवा, प्लेसमेकिंग, थीम पार्क्स, लाईटहाऊस आणि नागरिक सहभाग संवाद बैठक अशा प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे स्मार्ट सिटी देशातील इतर स्मार्ट सिटींना मार्गदर्शन करण्याचे कामसुद्धा करत आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसीसह धरमशाला (हिमाचल प्रदेश), फरिदाबाद (हरियाणा), मदुराई, सालेम, तिरुचिरापल्ली, तिरुप्पूर, वेल्लोर, इरोड (तामिळनाडू) आणि वाराणसी येथील अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीला भेटी देऊन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुणे स्मार्ट सिटीकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरी…
अलीकडच्या काही महिन्यांत पुणे स्मार्ट सिटीला चौथ्यांदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच स्कॉच अवॉर्ड, स्मार्ट सिटीज इंडिया ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि बिझनेस वर्ल्ड् डिजिटल इंडिया समिट अँड ऍवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट आयसीटी हे पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीने पटकावले.

Last modified: गुरुवार डिसेंबर 20th, 2018

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट