Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

रसिकांचे दर्जेदार मनोरंजन करत पुणे स्मार्ट वीकची सांगता

फेबृवारी २६, २०१९

रसिकांचे दर्जेदार मनोरंजन करत पुणे स्मार्ट वीकची सांगता

पंडित निलाद्री कुमार आणि भाडिपाच्या धमाल सादरीकरणांनी पुणेकरांचा वीकएंड झाला अभिरुची संपन्न

पुणे : अभूतपूर्व कला उत्सव पुणे स्मार्ट आर्ट वीकच्या अंतिम कार्यक्रमात, सतार वादक पंडित निलाद्री कुमार यांच्या सर्जनशील रचनांनी पुणेकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिवाजीनगर पोलिस परेड ग्राऊंडवर ‘सितार फंक’ कार्यक्रमात निलाद्री कुमार यांनी आपल्या प्रतिभाशाली संगीत रचनांनी श्रोत्यांना भारावून टाकले. त्यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेल्या झिटार या खास वाद्याचा उपयोग करून पारंपारिक शास्त्रीय पद्धतीच्या आधारे केलेल्या खास प्रस्तुतीने पंडित निलाद्री यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले. शनिवारी भारतीय डिजिटल पार्टी तथा भाडिपाने कॅज्युअल कल्ला केल्यानंतर निलाद्री यांचा खास नजराणा यामुळे पुणेकरांचा हा वीकएंड अभिरुची संपन्न झाला.

पुणे स्मार्ट वीक 2019 चा ग्रँड फिनाले म्हणजे अखेरच्या दिवशी आयोजित वैविध्यपूर्ण भरगच्च कार्यक्रमांमुळे पुणेकरांची रविवारची सकाळ उत्साहपूर्ण झाली. सकाळच्या वेळी कथक गुरू शमा भाटे यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक नृत्यांगनांनी केलेल्या फ्लॅश मॉब डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासोबत इतर हौशी युवक युवतींनीही सहभाग घेतला. रविवारचा पूर्ण दिवस जंगली महाराज रस्त्यावर कलाकार आणि रसिकांच्या वर्दळीने गजबजला होता. सकाळी 8 वाजल्यापासून वैविध्यपूर्ण झुम्बा डान्स, स्केटिंग, बॅडमिंटन, बुद्धिबळासारखे पटावरील विविध खेळ, ड्रम सर्कल अशा रंजक खेळांसह संगीत, नृत्यात लोक सहभागी झाले होते.

पुणे शहरात प्रथमच जंगली महाराज रस्त्याच्या कडेला सर्वात लांब कला दालनांतून स्ट्रीट आर्ट फेअर तथा कला यात्रा भरली होती. यात देशभरातील विविध शहरांतून आलेल्या २०० नामांकित कलाकारांनी स्वतःच्या शैलीत काढलेली चित्रे, निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या कलाकृती, हस्तकला वस्तू अविश्वसनीय किमतीत रसिकांना मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या कल्पनेतून साकारलेल्या कलाकृती प्रदर्शित करत कलाकारांनी पुणेकरांशी संवाद साधला.

पुणे स्मार्ट आर्ट वीकच्या यशस्वितेबाबत बोलताना पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे हे कलाप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. पुणेकरांच्या उत्साहवर्धक सहभागामुळे स्मार्ट आर्ट वीकचा कार्यक्रम पसंतीस उतरला असल्याची पावती मिळाली आहे. याद्वारे स्वतःतील सुप्त कला विकसित करण्यास प्रेरणा मिळाल्याचे अभिप्राय लोकांनी नोंदवले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कलाकार, अधिकारी, महापालिका, पुणे पोलिस आणि स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सर्वांच्या परिश्रमांतून पुण्याला एक स्मार्ट आणि शाश्वत शहर बनविण्यास प्रेरणा मिळत आहे.”

वरिष्ठ कलावंत सचिन कोल्हटकर म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केलेला पुणे स्मार्ट आर्ट वीकचा हा अभिनव उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोकांपर्यंत पोचण्यासाठी नवोदित तसेच प्रस्थापित कलाकारांना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले आहे. कलाकारांना नवसंजीवनी मिळेल. बहुतेक लोक आर्ट गॅलरीमध्ये जात नाहीत; पण स्ट्रीट आर्ट फेअर लोकांमध्ये कला आणत आहे, जागरुकता निर्माण करीत आहे आणि कारण ते एक परवडणारा कलामंच आहे. कला त्यांच्यापर्यंत पोचू शकते. पुणे स्मार्ट वीकमध्ये कलेच्या क्षेत्रात पुणे शहराच्या ब्रँडचे मूल्य आणि सन्मान वाढवला आहे असे मला वाटते. पुणे शहराला या निमित्ताने त्यांचा स्वत:चा कला उत्सव प्राप्त झाला आहे. दरवर्षी हा उत्सव झाला पाहिजे.”

स्ट्रीट आर्ट फेस्टमध्ये सहभागी झालेली युवा कलाकार श्वेता एकतारे म्हणाली, “माझ्यासारख्या कलाकारांना नेमक्या रसिक वर्गाशी जोडले जाण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे.”

“पुणे स्मार्ट वीकमधील स्ट्रीट आर्ट फेअर हा एक मजेदार कौटुंबिक कार्यक्रम आहे. यामध्ये आम्ही कलाकृती विकत घेतल्या, तसेच कलाकारांना भेटलो आणि माझ्या मुलांनी त्यांच्या कामातून प्रेरणा मिळाली,” असे पुणेकर आरती ग्रामपुरोहित यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी www.punesmartweek.com संकेतस्थळाला भेट द्या किंवा पुणे स्मार्ट वीक हे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट