Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

मध्यप्रदेशातील चार स्मार्ट सिटींच्या अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा केला अभ्यास दौरा

जानेवारी ३०, २०१९

मध्यप्रदेशातील चार स्मार्ट सिटींच्या अधिकाऱ्यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा केला अभ्यास दौरा
पुणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे मॉडेल मध्यप्रदेशातील शहरांमध्ये राबविण्याचा विचार

पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत मध्यप्रदेशातील चार शहरांतील अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने पुण्याचा विशेष अभ्यास दौरा करून पुणे स्मार्ट सिटीच्या विकसित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
मध्यप्रदेशातील उज्जैन, जबलपूर, सतना आणि सागर या शहरांतील दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरी विकासासंदर्भात यशदा येथे आयोजित एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यामध्ये स्मार्ट स्ट्रीट, स्मार्ट प्लेस मेकिंग, पुणे वाय-फाय व स्मार्ट इलेमेंट्स या कामे पूर्ण झालेल्या तसेच सध्या सुरु असलेल्या आणि आगामी प्रकल्पांचे सादरीकरणही यावेळी या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळापुढे करण्यात आले.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून विविध प्रकल्पांची अंमलबजावणी स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांना नागरिकांचा मोठा पाठिंबा आणि राष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. हे प्रकल्प अभ्यासण्यासाठी इतर राज्यांतूनही अधिकाऱ्यांची पथके येत आहेत ही आनंदाची बाब आहे.”

या अधिकाऱ्यांच्या पथकाने बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील ‘रिन्यू व एनर्जाईज’ या दोन स्मार्ट प्लेसमेकिंग साईट्सना भेट दिली. औंधमधील स्मार्ट स्ट्रीटची विविध वैशिष्ट्ये प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतली. सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर येथील डिजिटल अनुभव केंद्र, कमांड अँड कंट्रोल सेंटर प्रकल्पाला भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली. अल्प उत्पन्न गटासाठीच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या औंधमधील ‘लाईटहाऊस’ या प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली. तिथे दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली, तसेच येथे प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळविलेल्या युवतींशी संवाद साधला. यावेळी यशदाचे अधिकारी अमोल बामिस्टे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मध्यप्रदेशच्या पथकातील अधिकारी चंद्रमणी द्विवेदी म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेले पुणे स्मार्ट सिटीचे प्रकल्प पाहण्याची व त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची संधी आम्हाला मिळाली. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना लाभदायी प्रकल्प प्रभावीपणे कसे राबवता येतात हे पाहता आले.”
—————————————————————

Last modified: मंगळवार जानेवारी 30th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट