Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

काव्यमैफल, शास्त्रीय संगीत, चित्रपट अन् अभ्यासपूर्ण व्याख्यानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फेबृवारी २१, २०१९

काव्यमैफल, शास्त्रीय संगीत, चित्रपट अन् अभ्यासपूर्ण व्याख्यानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्ररुपी कलाकृतींमधून उलगडले मुलांच्या कल्पनेतील स्मार्ट पुणे

पुणे : शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये या भावी नागरिकांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक दिसून येत आहे. घोले रोड येथील राजा रवि वर्मा कला दालनात या मुलांनी रेखाटलेल्या चित्ररुपी कलाकृतींच्या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजित पुणे स्मार्ट आर्ट वीकमध्ये अभिनेता राकेश वशिष्ठ, श्यामची आई फाऊंडेशनच्या संस्थापक शीतल बापट, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘चिंटू’चे लेखक चारुहास पंडित उपस्थित होते. मुलांच्या कल्पनेतील स्मार्ट पुणे दाखवणारे हे प्रदर्शन २४ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे.

वैभव जोशी, संदीप खरे आणि सावनी शेंडे यांच्या काव्यमैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. इस्राईल सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित डेव्हिड शुलमन यांनी नेहरू सभागृहात आयोजित इंडॉलॉजीवरील व्याख्यानातून महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी विशद केली. त्यानंतर पंडित पुष्कर लेले यांच्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजा रवि वर्मा कलादालनात मंजिरी मोरे यांचे लाईव्ह पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक झाले.

अभिनेता राकेश बापट म्हणाला, “पुणे स्मार्ट सिटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर 11 दिवसांचा स्मार्ट वीक हा कला महोत्सव आयोजित केला आहे याचे मला मनापासून कौतुक वाटते. पुणेकरांना कला दाखविण्याची आणि आस्वाद घेण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.”

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांना प्रशासनाशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सार्वजनिक कार्यक्रमांतून सामाजिक समावेशकता दृढ होईल अशी आशा आहे.”

दरम्यान, दिलीप कुमार यांचा कायमस्वरुपी प्रेक्षक खेचणारा देवदास आणि मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाने क्लासिक आणि काँटेम्पररी चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. संभाजी उद्यानात ओपन माईक कार्यक्रमात हौशी कलाकारांनी सहभाग नोंदवून उपस्थितांचे मनोरंजन केले.

“पुणे शहराचा असा खास कला महोत्सव होत आहे याचा आनंद आहे. तसेच यामधून दिसून येणारी सर्जनशीलता वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या चौकटीबाहेरील विचारांना, सर्जनशीलतेला यातून मिळणारी प्रेरणा फायद्याची ठरेल,” असे शीतल बापट यांनी सांगितले.

पुणे स्मार्ट वीकमधील कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती www.punesmartweek.com या संकेतस्थळावर किंवा पुणे स्मार्ट वीक या मोबाईल ऍप्लिकेशनवरून नागरिकांना मिळेल.

या. सहभागी व्हा. साजरा करा.

….

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट