Language:

  • English
  • मराठी

पुणे स्मार्ट सिटीमध्ये आपले स्वागत आहे

टोल मुक्त: १८०० १०३० २२२

शिवमय वातावरणात पुणेकरांनी घेतला कलेचा आस्वाद

फेबृवारी २०, २०१९

शिवमय वातावरणात पुणेकरांनी घेतला कलेचा आस्वाद

मुलींचे मर्दानी खेळ, पोवाडा आणि कॅलिग्राफीतील शिवमुद्रांनी जिंकली शिवभक्तांची मने

पुणे : इतिहासातील एकमेवाद्वितीय असे महापुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना साजेशी अशी भव्य आदरांजली वाहण्यासाठी शेकडो पुणेकर जंगली महाराज रस्त्यावर जमले होते. भारतीय मार्शल आर्ट्स, पोवाडा आणि कॅलिग्राफी अशा तीन कलांचा संगम साधत शिवमुद्रा या कार्यक्रमातून ही अनोखी आदरांजली वाहण्यात आली. शिवशंकर प्रतिष्ठानच्या साहसी युवतींनी शिवकालीन शस्त्रे वापरून युद्ध कौशल्यांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. शिवमय वातावरणात अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर उतरविलेल्या कॅलिग्राफी कलेचा अविष्कार लक्षवेधक ठरला. शाहीर कृष्णात पाटील यांच्या पोवाड्याने उपस्थित पुणेकरांमध्ये शिवभक्तीची ज्योत पेटवली.

दरम्यान, जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर उभारण्यात आलेल्या विविध रचना खास पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. स्मार्ट पुणे या हॅशटॅगच्या रचनेसोबत तसेच वास्तुरचना महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या रचनांजवळही युवक युवती सेल्फी घेत आहेत. पुणे स्मार्ट वीकअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये आयोजित क्लासिक्स अँड काँटेम्पररी चित्रपट महोत्सवात गुळाचा गणपती आणि ऑस्कर नामांकित डीअर मॉली या चित्रपटांना रसिकांनी आवर्जून उपस्थिती लावली.

साहित्य आणि संवाद महोत्सवात (लिटरेचर फेस्ट) छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यवस्थापन कौशल्ये या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना शिवरायांच्या व्यक्तिमत्वातील अत्यंत वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला.

डॉ. अजित आपटे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणातील प्रत्यक्ष लढायांशिवाय इतर व्यावसायिक आणि आर्थिक पातळ्यांवर देखील शत्रूला नामोहरम करत त्यांच्यावर मात केली. केवळ महाराष्ट्र आणि भारत देश एवढ्यापुरते शिवछत्रपतींकडे न पाहता एक जागतिक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची आणि त्या दृष्टिकोनातून शिवचरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे.”

पार्थजीत शर्मा यांच्या डिझाईन थिंकिंग या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सौ. प्रियांका सौरभ राव यांनी विशेष उपस्थिती लावत डिझाईनच्या कार्यशाळेत पूर्ण वेळ सक्रिय सहभाग नोंदवला. अमित ढाणे यांनी प्रत्यक्ष चित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे केले.

साहित्य आणि संवाद महोत्सवात रॉक कट आर्किटेक्चर आणि लेणी या विषयावरील व्याख्यानात डॉ. मंजिरी भालेराव यांनी विविध कालखंडांमध्ये खडकांच्या रचनांबद्दल महत्त्वाची माहिती दिली.

पुणे स्मार्ट आर्ट वीकमध्ये प्रत्येक पुणेकरासाठी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या अभिरुचीनुसार सहभागी होऊन त्याचा कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापौर सौ. मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले.

पुणे स्मार्ट वीकमधील कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती www.punesmartweek.com या संकेतस्थळावर किंवा पुणे स्मार्ट वीक या मोबाईल ऍप्लिकेशनवरून नागरिकांना मिळेल.

या. सहभागी व्हा. साजरा करा.

….

बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 : पुणे स्मार्ट आर्ट वीकमध्ये…

सकाळी 11 वाजल्यापासून : मुलांसाठी स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन, प्रदर्शन- राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड.

दुपारी 3 वाजता : चित्रपट महोत्सव : देवदास- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड.

सायंकाळी 5 वाजता : इर्शाद काव्यमैफल- सादरकर्ते : संदीप खरे, वैभव जोशी व सावनी शेंडे- बालगंधर्व रंगमंदिर.

सायंकाळी 5 वाजता : थेट चित्र रेखाटन प्रात्यक्षिक – सादरकर्ते : मंजिरी मोरे- राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड.

सायंकाळी 5 वाजता : परिचय इंडोलॉजीचा- व्याख्याते : डॉ. डेव्हिड शुलमन- पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड.

सायंकाळी 5.45 वाजता : हिंदुस्तानी शास्त्रीय गायन- सादरकर्ते : पं. पुष्कर लेले- पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड.

सायंकाळी 7 वाजता : चित्रपट महोत्सव : मुळशी पॅटर्न- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड.

सर्व कार्यक्रम विनामूल्य.

Last modified: गुरुवार फेबृवारी 28th, 2019

फॉन्ट रिसाईझ
कॉन्ट्रास्ट